पनामाचे परराष्ट्रमंत्री झेवियर एडवर्ड मार्टिनेज आचा वासकेझ यांनी भारताला 5 दिवसांची अधिकृत भेट दिली. या दौऱ्यात दोन्ही देशांतील राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक संबंध वाढवण्यावर चर्चा झाली.
नवी दिल्ली, भारत १ ऑग, २०२६ ALN: पनामाचे परराष्ट्रमंत्री झेवियर एडवर्ड मार्टिनेज आचा वासकेझ यांनी 19 जुलै ते 24 जुलै 2026 या कालावधीत भारताला 5 दिवस अधिकृत भेट दिली. या दौऱ्यामध्ये त्यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, बंदरे जहाज बांधणी व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह प्रमुख भारतीय नेत्यांशी उभय देशातील राजकीय आर्थिक व सांस्कृतिक संबंध वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त चर्चा केली. पनामा परराष्ट्र मंत्र्यांची ही बैठक बहुउद्देशीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. कारण दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध सुधारणे अगत्याचे झाले आहे.
उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडाला जोडणारा पनामा कालवा हा भूराजनैतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जेवढे महत्त्व होर्मुझच्या सामुद्रधुनीला आहे तेवढेच महत्त्व पनामा कालव्याला सुद्धा आहे. हे लक्षात घेऊन भारताने इंडोनेशिया आणि म्यानमार बरोबर जशी मैत्री प्रस्थापित केली आहे तशीच मैत्री दक्षिण अमेरिकेतील पनामा गणराज्याशी सुद्धा प्रस्थापित केली आहे. भू राजनैतिक दृष्टीने विचार करता पनामा गणराज्याशी मैत्रीचे संबंध असणे भारताला तीन दृष्टीने लाभदायक ठरू शकते. पहिले म्हणजे भारताचे ब्राझील, अर्जेंटिना या दक्षिण अमेरिकेतील देशांशी असलेले आर्थिक, सांस्कृतिक व भक्कम व्यापारी संबंध हे होय तसेच सध्या भारताने व्हॅनेझुएला या दक्षिण अमेरिकेतील देशाकडून कच्चा तेलाचा पुरवठा सुरू केला आहे तसेच गयाना या देशाबरोबर सुद्धा भारताचे ऊर्जा संबंध प्रस्थापित झाले आहेत. तिसरे म्हणजे दक्षिण अमेरिकेतील गयाना, सुरीना, त्रिनिदाद, टोबॅको या देशातील भारतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आर्थिक संबंधापासून ते सांस्कृतिक आणि व्यापारी संबंधपर्यंत तसेच भविष्यात सामरिक भागीदारीला गती देण्यासाठी सुद्धा पनामासोबत मैत्रीपूर्ण संबंध असणे आवश्यक आहे.
भू राजनैतिक महत्त्व
भू राजनैतिक दृष्टीने विचार करता पनामा गणराज्याचे स्वतंत्र महत्त्व आहे. विशेषत: उत्तर आणि दक्षिण अमेरिकेला जोडणारा भू सेतू म्हणून हे गणराज्य ओळखले जाते. उत्तरेला असलेला अटलांटिक महासागर म्हणजे कॅरिबियन समुद्र आणि दक्षिणेला असलेला पॅसिफिक महासागर या दोहोंना जोडणारा प्रवेशद्वार म्हणून त्याला विशेष महत्त्व आहे. या देशाच्या पश्चिमेला कोष्टारीका आणि पूर्वेला कोलंबिया हे दोन छोटे देश वसलेले आहेत. अमेरिका, चीन यांच्यातील स्पर्धा आणि राजकीय दबावामुळे पनामा संघर्षातून वाटचाल करत आहे. जलमार्गाच्या तटस्थतेचे रक्षण करणे हे या देशाचे वेगळेपण होय. भारतासारख्या लोकशाही भागीदाराचा सक्रिय पाठिंबा मिळविण्याचा पनामाचा प्रयत्न आहे. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि हिंद प्रशांत क्षेत्राला जोडण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा म्हणून हा देश काम करत आहे. 80 किलोमीटर लांबीच्या कालव्यामुळे या देशाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. जागतिक पातळीवर रसद पुरवठा करणे आणि सागरी सुरक्षेसाठी नियंत्रक म्हणून काम करणे ही सुद्धा या देशाची जबाबदारी बनली आहे. भारतासारख्या तटस्थ आणि विकसनशील देशाबरोबर संबंध प्रस्थापित करून सत्ता समतोल साधण्याचा पनामाचा प्रयत्न आहे.
पनामाचे भूराजनैतिक स्थान भारताच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे कारण आता भारत जगातील चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून पुढे सरकण्यासाठी गंभीरपणे प्रयत्न करत आहे. या प्रयत्नात पनामाचा सिंहाचा वाटा असणार आहे. भारत-पनामा वाढत्या मैत्रीचे रूपांतर आता भविष्यात आर्थिक भागीदारीमध्ये होणार आहे. अमेरिका व चीन यांच्या तीव्र स्पर्धेला कंटाळलेल्या पनामाला भारताचा भक्कम आधार हवा आहे. पनामा परराष्ट्र मंत्र्याची बैठक या वळणावर अधिक महत्त्वाची असल्याचे नमूद केले जात आहे.
परराष्ट्र मंत्र्यांची भेट
पनामाचे परराष्ट्रमंत्री झेवियर एडवर्ड मार्टिनेज आचा वासकेझ यांनी 19 जुलै ते 24 जुलै 2026 या कालावधीत भारताला पाच दिवस अधिकृत भेट दिली. या दौऱ्यामध्ये त्यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह प्रमुख भारतीय नेत्यांशी उभय देशातील राजकीय आर्थिक व सांस्कृतिक संबंध वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त चर्चा केली. पनामा परराष्ट्र मंत्र्यांची ही बैठक बहुउद्देशीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. कारण दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध सुधारणे अगत्याचे झाले आहे. बदलत्या जागतिक संदर्भात दोन्ही देशातील सहकार्याचा उपयुक्त आढावा हैदराबाद हाऊस येथे झालेल्या चर्चेतून घेण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे कॅनडा ज्याप्रमाणे वैतागला आहे त्याप्रमाणे दक्षिण अमेरिकेतील अनेक देशसुद्धा त्रस्त झाले आहेत त्यापैकी पनामा हा एक देश होय.
वाढते व्यापार आणि वाणिज्य संबंध
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून दोन्ही नेत्यांनी बाजारपेठेतील प्रवेश नवीन गुंतवणुकीची क्षेत्रे लॉजिस्टिक्स आणि भारताच्या सार्वजनिक पेमेंट प्रणालीच्या पनामामधील वापराच्या अनुषंगाने चर्चा झाली आहे. डिजिटल अर्थकारणाला गती देण्यासाठी दोन्ही देशांनी परस्पर सहकार्यासाठी मदतीचे हात पुढे करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे डॉलर ऐवजी रुपयामध्ये पनामा या देशात व्यवहार करणे शक्य होईल तसेच पनामाच्या मैत्रीमुळे सर्व दक्षिण अमेरिकेतील देशांशी भारताचा असलेला व्यापार दुप्पट करणे सुद्धा शक्य होणार आहे. पनामाशी मैत्री करून दक्षिण अमेरिकेचे व्यापारी दार भारतीय वस्तू व सेवा तसेच तरुणांच्या रोजगारासाठी खुले करण्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे दक्षिण अमेरिकेत मानवी संसाधन विकासाला सुद्धा मोठी चालना मिळू शकेल. भारत आणि पनामा यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधामुळे दक्षिण अमेरिकेत 25 पेक्षा अधिक देशांशी भारताला मालाची ने-आण करणे आणि व्यापाराला उत्तेजन देणे शक्य होईल तसेच या प्रदेशाशी मुक्त व्यापार करण्याच्या दृष्टीने सुद्धा काही पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे असे म्हणता येईल. पनामा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा सदस्य होत आहे. भारताने स्थापन केलेल्या सौर आघाडीसोबत पनामाने भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे संयुक्त सौर ऊर्जा उपक्रम आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीस त्यामुळे गती मिळेल शिवाय नवी दिल्लीतील भारतीय तंत्रनिकेतन संस्थेमध्ये पनामातील तज्ञांना विशेष प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आखण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे.
प्रादेशिक पातळीवर लॉजिस्टिक सुविधांचा विकास आणि त्यासाठी गुंतवणूक या दृष्टीने टाकलेली पावले महत्त्वाची आहेत. भारतीय कंपन्यांना आपल्या 20 अब्ज डॉलर्सच्या पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स पाईपलाईनचा लाभ घेण्यासाठी पनामाने आमंत्रित केले आहे तसेच पनामाला संपूर्ण लॅटिन अमेरिकेतील भारतीय औषध निर्माण उद्योग तसेच तंत्रज्ञान टेक कंपन्या व विविध उत्पादन कंपन्यांसाठी एक व्यावसायिक केंद्र आणि दक्षिण अमेरिकेचे प्रवेशद्वार म्हणून विकसित करण्यावर भर दिला आहे. वाणिज्य मंत्रालयासमवेत झालेल्या चर्चेमुळे भारताच्या डिजिटल पायाभूत सार्वजनिक सुविधा यूपीआयचा लाभ घेणे आणि बाजारपेठेतील प्रवेश तसेच द्विपक्षीय गुंतवणुकीला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
सागरी सुरक्षा आणि सामरिक सहकार्य
होर्मुझमध्ये जे घडले ते पनामामध्ये घडू नये म्हणून भारत काळजी घेत आहे. पनामा कालव्यातील भारताच्या जहाज वाहतुकीच्या संदर्भात पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि भारताला त्याचा लाभ कसा होईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. दक्षिण अमेरिकेतील देशांशी व्यापाराची द्वारे खुली करण्यासाठी पनामाचे सहकार्य आवश्यक आहे हे लक्षात घेऊन पनामा गणराज्याशी मैत्रीपूर्ण संबंध विकसित करणे व पुढे अधिक चांगले बनविणे यावर भर दिला जात आहे.
सागरी सुरक्षा व हितसंवर्धनावर दोन्ही देशांनी भर दिला आहे. आंतरराष्ट्रीय जहाज वाहतूक मार्ग सुरक्षित करणे आणि सागरी मार्गाचे गतीवर्धन करणे यावर दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली आहे. सागरी मार्गांचे राजकारण केले जाऊ नये किंवा इतर राष्ट्रावर दबाव आणण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ नये, याबद्दल दोन्ही देशांनी एकमत व्यक्त केले आहे.
प्रा.डॉ.वि.ल.धारूरकर
To learn more about the latest developments in Culture & Society, stay updated with our exclusive reports and analyses on AiLensNews.