• Home
  • Health
  • Diseases & Conditions
  • पुरुष वंध्यत्व आणि व्हेरिकोसिल: तज्ज्ञांची माहिती

पुरुष वंध्यत्व: मूल होण्यात अडचण येतेय? व्हेरिकोसिलबद्दल डॉक्टर काय सांगतात? वाचा

ALN NEWS DESK
ALN NEWS DESK
Updated : Jul 9, 2026, 03:56 PM IST
5 min read
  • linkedin
  • twitter
  • facebook
  • instagram
  • whatsapp

तज्ज्ञांच्या मते, व्हेरिकोसिल ही समस्या अनेक पुरुषांमध्ये आढळते, ज्यामुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. याबद्दल अधिक जाणून घ्या.

पुरुषांच्या वंध्यत्वामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र त्यापैकी एक महत्त्वाचं आणि तुलनेने सामान्य कारण म्हणजे व्हेरिकोसिल (Varicocele). या परिस्थितीमध्ये अंडकोषाभोवतीच्या शिरा (veins) सुजतात किंवा फुगतात.

तज्ज्ञांच्या मते, ही समस्या अनेकदा कोणतीही ठळक लक्षणं न देता विकसित होते आणि पुरुषांना त्याची माहितीही नसते. मात्र काही प्रकरणांमध्ये अंडकोषात जडपणा, वेदना, सूज किंवा प्रजननक्षमतेवर परिणाम दिसून येऊ शकतो.

Mayo Clinic आणि Cleveland Clinic यांच्या माहितीनुसार, व्हेरिकोसिलचा संबंध कमी शुक्राणू संख्या (sperm count), शुक्राणूंची गुणवत्ता आणि पुरुष वंध्यत्वाशी जोडला जातो.

साधारणपणे प्रत्येक पाच पुरुषांपैकी एकाला आयुष्यात कधीतरी व्हेरिकोसिल होऊ शकतो, मात्र सर्वांनाच उपचारांची गरज भासते असं नाही. काही रुग्णांमध्ये केवळ निरीक्षण पुरेसं ठरतं, तर काहींना शस्त्रक्रिया किंवा इतर उपचारांची आवश्यकता असू शकते.

मग व्हेरिकोसिल नेमकं काय आहे? त्याची लक्षणं कोणती आहेत? त्याचा प्रजननक्षमतेवर कसा परिणाम होतो? आणि कोणत्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.

व्हेरिकोसिलचा प्रजननक्षमतेशी काय संबंध?

व्हेरिकोसिल म्हणजे अंडकोषातील (स्क्रोटममधील) शिरा फुगणे. पायांमध्ये दिसणाऱ्या व्हेरिकोज व्हेन्सप्रमाणेच ही स्थिती असते. या शिरांमधील झडपा (Valves) योग्य प्रकारे कार्य करत नसल्यामुळे रक्त हृदयाकडे सुरळीत परत जाण्याऐवजी त्या शिरांमध्ये साचते. त्यामुळे शिरांवरील दाब वाढतो आणि त्या फुगतात.

व्हेरिकोसिल ही पुरुषांमध्ये सामान्यपणे आढळणारी समस्या असून सुमारे 15 टक्के पुरुषांमध्ये ती दिसून येते. किशोरवयीन आणि तरुणांमध्ये तिचे प्रमाण अधिक असते. वंध्यत्वाच्या तपासणीसाठी येणाऱ्या पुरुषांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आढळते.

तथापि, व्हेरिकोसिल असलेल्या प्रत्येक पुरुषाला वंध्यत्वाचा त्रास होतोच असं नाही. अनेक पुरुष कोणत्याही अडचणीशिवाय पितृत्व अनुभवू शकतात. म्हणूनच तज्ज्ञ लक्षणं, वय, अंडकोषाची वाढ, वेदना आणि वीर्य तपासणीचे निष्कर्ष यांचा एकत्रित विचार करून उपचाराचा निर्णय घेतला जातो.

व्हेरिकोसिलची सामान्यतः दिसणारी लक्षणं कोणती?

अनेक पुरुषांमध्ये व्हेरिकोसिलची कोणतीही लक्षणं नसतात. नियमित आरोग्य तपासणी किंवा वंध्यत्वाच्या तपासणीदरम्यान ही समस्या निदर्शनास येते.

लक्षणे दिसल्यास त्यामध्ये:

  • अंडकोषात बोथट किंवा सतत दुखणे, विशेषतः दीर्घकाळ उभे राहिल्यानंतर किंवा शारीरिक श्रमानंतर
  • अंडकोषात जडपणा जाणवणं
  • शिरा फुगलेल्या दिसणं
  • विशेषतः तरुणांमध्ये एका अंडकोषाचा आकार दुसऱ्यापेक्षा लहान दिसणं

अंडकोषात सतत वेदना किंवा आकारात बदल जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. व्हेरिकोसिल प्रामुख्याने पौगंडावस्थेत विकसित होते आणि शरीररचनेतील फरकामुळे बहुतेक वेळा डाव्या बाजूला आढळतो.

पुरुषांची प्रजनन क्षमता आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो का?

व्हेरिकोसिलचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर आणि शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते का असा प्रश्न आम्ही ठाण्यातील किम्स हॉस्पिटलमध्ये सल्लागार युरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अकिल खान यांना विचारला.

यावर डॉ. अकिल खान म्हणाले, होय. व्हेरिकोसिलमुळे अंडकोषाभोवतीचे तापमान वाढते आणि रक्ताभिसरणावर परिणाम होतो. त्यामुळे शुक्राणूंची निर्मिती आणि कार्यक्षमता कमी होऊ शकते.

ते पुढं सांगतात, "व्हेरिकोसिलमुळे शुक्राणूंची संख्या कमी होणं, त्यांची हालचाल म्हणजे Motility कमी होणं, त्यांच्या रचनेत दोष तयार होणं असे परिणाम दिसू शकतात. तसंच काही पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो. याचा अर्थ व्हेरिकोसिल असलेल्या प्रत्येक पुरुषाला वंध्यत्वाचा त्रास होईल असं नाही तर ते एक पुरुष वंध्यत्वाचं एक महत्त्वाचं कारण आहे आणि त्यावर उपचार करता येतात."

व्हेरिकोसिल झालेल्या प्रत्येकाला उपचाराची गरज असते का?

व्हेरिकोसिलच्या निदानाबद्दल डॉ. अकिल खान सांगतात, "या निदानासाठी अनुभवी युरोलॉजिस्टकडून करण्यात आलेली सविस्तर शारीरिक तपासणी अनेकदा निदानासाठी पुरेशी असते. विशेषतः रुग्ण उभा असताना किंवा हलका जोर (Straining) दिल्यास ते निदान करू शकतात. मात्र, निदानाबाबत शंका असल्यास, व्हेरिकोसिल सहज जाणवत नसल्यास, त्याची तीव्रता तपासण्यासाठी अंडकोषाची डॉप्लर अल्ट्रासाऊंड चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. वंध्यत्वाची समस्या असलेल्या पुरुषांमध्ये वीर्य तपासणी (Semen Analysis) देखील अत्यंत महत्त्वाची असते."

जर व्हेरिकोसिलमुळे वेदना, वंध्यत्व किंवा अंडकोषाचा आकार कमी होण्याची समस्या नसेल, तर उपचाराची गरज नसते. अशा रुग्णांमध्ये नियमित फॉलो-अप पुरेसा ठरतो, असं तज्ज्ञांचं मत असतं.

डॉ. अकिल खान यांच्या मते, "सतत वेदना होत असतील, औषधं घेऊनही आराम वाटत नसेल, मूल जन्माला घालण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पुरुषांच्या वीर्य तपासणीत दोष आढळला, व्हेरिकोसिलमुळे वंध्यत्व आल्यास तसेच किशोरवयीन मुलांमध्ये अंडकोषाची वाढ कमी झाल्यास उपचाराची गरज असते."

डॉ. सोनी मेहता सांगतात, "व्हेरिकोसिलच्या उपचारांसाठी मायक्रोसर्जिकल व्हेरिकोसेलेक्टॉमी, लॅप्रोस्कोपी आणि पर्क्युटेनियस एम्बोलायझेशन हे पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी मायक्रोसर्जिकल व्हेरिकोसेलेक्टॉमी ही सर्वाधिक वापरली जाणारी आणि प्रभावी पद्धत मानली जाते, कारण तिचा यशाचा दर जास्त असून गुंतागुंतीचा धोका तुलनेने कमी असतो."

ते पुढे सांगतात, खालील परिस्थितींमध्ये शस्त्रक्रियाचा विचार केला जातो:

  • वंध्यत्वाची समस्या असून शुक्राणू चाचणी (स्पर्मोग्राम) असामान्य असणे
  • दीर्घकाळ अंडकोषाच्या पिशवीत (स्क्रोटममध्ये) वेदना होणे आणि औषधोपचारांनी आराम न मिळणे
  • किशोरवयीन मुलांमध्ये अंडकोषांच्या वाढीचा वेग कमी असणे

या शस्त्रक्रियेमध्ये असामान्यरीत्या फुगलेल्या रक्तवाहिन्या (शिरा) बंद केल्या जातात, तर धमन्या, लसिकावाहिन्या (lymphatics) आणि इतर महत्त्वाच्या आसपासच्या संरचना सुरक्षित ठेवण्यात येतात.

ते सांगतात, "काही रुग्णांना शस्त्रक्रियेऐवजी खालील संरक्षणात्मक (conservative) उपाय उपयुक्त ठरू शकतात:

  • स्क्रोटल सपोर्ट (अंडकोषांना आधार देणारे अंतर्वस्त्र) वापरणे
  • दीर्घकाळ उभे राहणे टाळणे
  • वेदना होत असल्यास जड शारीरिक व्यायाम किंवा वजन उचलणे टाळणे
  • आवश्यकतेनुसार वेदनाशामक औषधे घेणे

महत्त्वाचे म्हणजे, केवळ व्हेरिकोसिल आहे म्हणून शस्त्रक्रिया केली जात नाही. प्रत्येक रुग्णाची लक्षणे, वय, प्रजननक्षमता आणि एकूण आरोग्य लक्षात घेऊन उपचाराचा निर्णय वैयक्तिक पातळीवर घेतला जातो.

रुग्ण पुन्हा कधीपासून आपली कामं पूर्ववत करू शकतो? असं विचारल्यावर ते म्हणाले, "बहुतेक रुग्णांची प्रकृती लवकर सुधारते आणि ते साधारणपणे एक-दोन आठवड्यांत त्यांच्या दैनंदिन कामकाजाकडे परत जाऊ शकतात. मात्र, शुक्राणूंची नवीन निर्मिती होण्यासाठी वेळ लागत असल्याने शुक्राणू चाचणीतील सुधारणा साधारण 3 ते 6 महिन्यांनंतर दिसून येऊ शकते."

पण व्हेरिकोसिलच्या उपचारांनंतर हा त्रास पुन्हा होऊ शकतो का? हा प्रश्न राहातोच.

त्यावर डॉ. मेहता म्हणतात, "होय, व्हेरिकोसिलवर उपचार केल्यानंतरही काही प्रकरणांमध्ये तो पुन्हा उद्भवू शकतो. मात्र, प्रगत मायक्रोसर्जिकल तंत्राचा वापर केल्यास पुनरावृत्तीची शक्यता तुलनेने कमी असते. यामागे काही असामान्य रक्तवाहिन्या पूर्णपणे बंद न होणे किंवा कालांतराने नव्या पर्यायी रक्तवाहिन्या (collateral veins) तयार होणे ही कारणे असू शकतात. पुनरावृत्तीची शक्यता वापरलेल्या उपचारपद्धतीनुसार बदलते. मायक्रोसर्जिकल व्हेरिकोसेलेक्टॉमीमध्ये पुनरावृत्तीचा धोका लॅप्रोस्कोपी किंवा एम्बोलायझेशनच्या तुलनेत कमी असतो."

Get More Updates

To learn more about the latest developments in Diseases & Conditions, stay updated with our exclusive reports and analyses on AiLensNews.

Related News