भारतात प्रजनन दर कमी होण्याची कारणे आणि त्यावर उपाय याबद्दल सविस्तर माहिती. प्लास्टिक, प्रदूषण आणि रसायनांचा मानवी जननक्षमतेवर होणारा परिणाम.
मुंबई, भारत १२ जुलै, २०२६ ALN: गेल्या काही वर्षांत शहर आणि ग्रामीण भागात प्रजनन दर कमी होत आहे. लोकसंख्या स्थिरावण्यासाठी प्रजनन दर २.१ असावा लागतो. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार २०२३ नंतर हा प्रजनन दर १.९ पर्यंत कमी झाला. भारतासारख्या देशात जिथे वाढती लोकसंख्या ही समस्या मानली जाते तिथेही दिवसेंदिवस कमी होत जाणारा प्रजनन दर हा चिंतेचा विषय आहे. प्रजनन दर कमी होण्यामागे विविध सामाजिक कारणांबरोबरच वैद्यकीय कारणे अर्थात प्रदूषणादी कारणेही मनुष्यजातीचे महत्त्वाचे शत्रू ठरत आहेत, हे सांगणारा वंध्यत्व आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अवंतिका वझे (परब) यांचा खास लेख आजच्या (११ जुलै) जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने…
‘जागतिक आरोग्य संघटने’च्या व्याख्येनुसार एकूण प्रजनन दर म्हणजे एका स्त्रीला संपूर्ण प्रजनन क्षमतेच्या कालावधीत होणार्या मुलांची सरासरी संख्या. गेल्या ५० वर्षांत जगात प्रजनन दरात सातत्याने घट होत आहे. १९६० ते २०२१ या काळात जगात एका स्त्रीच्या पोटी जन्मलेल्या अपत्याची संख्या ५ वरून २.४ पर्यंत खाली आलेली आहे. कमी होणार्या प्रजनन दरामुळे भारतासारख्या देशात जिथे लोकसंख्या ही समस्या मानली जाते तिथेदेखील काळजी व्यक्त केली जात आहे. लोकसंख्या स्थिरावण्यासाठी २.१ हा प्रजनन दर असावा लागतो. ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणा’ (NFHS) नुसार भारतामध्ये हा दर २०१६ मध्ये २.२ होता, २०२१-२२ मध्ये तो २.० वर आला आणि २०२३ नंतर तो १.९ आहे, म्हणजे प्रजनन दर लोकसंख्या टिकवण्यासाठी आवश्यक पातळीपेक्षा कमी आहे (below replacement level). आणि तो शहर आणि ग्रामीण दोन्ही ठिकाणी कमी होत आहे.
सध्या १४६ कोटींपेक्षा जास्त असलेली आपली लोकसंख्या २०५०-६० पर्यंत १७० कोटी होईल आणि त्यानंतर दररोज होणारे मृत्यू हे दररोज होणार्या जन्मापेक्षा जास्त होऊन लोकसंख्या कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अजूनही भारताला तरुणांचा देश म्हणून संबोधण्यात येते कारण आज भारतीयांचे सरासरी वय २९ आहे. संपूर्ण जगात सरासरी वय हे ३१ वर्षं आहे. मात्र प्रजनन दर कमी झाल्यावर हे वय हळूहळू वाढणार आणि २०५० च्या आसपास बहुसंख्य लोक हे ४० ते ७० या वयोगटात, म्हणजेच प्रौढ व वयस्करच जास्त असतील, असे ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अहवालात म्हटले आहे.
या कमी झालेल्या प्रजनन दरामागे प्रामुख्याने सामाजिक कारणे आहेत. स्त्रियांना उपलब्ध झालेल्या शिक्षण व व्यवसायाच्या संधी, लग्नाचे वाढलेले वय, गर्भनिरोधकांची सहज उपलब्धता ही त्यामागची महत्त्वाची कारणे. मात्र या सामाजिक कारणांव्यतिरिक्त काही वैद्यकीय कारणेदेखील प्रजनन दर कमी करण्यास कारणीभूत आहेत. आधुनिक जीवनशैली, उत्तम वैद्यकीय सुविधा, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, सुधारलेली आर्थिक परिस्थिती असूनही आपण या कमी झालेल्या प्रजनन दराबद्दल का काळजी करत आहोत? हे खोलात जाऊन शोधायला हवे आणि त्यानुसार काळजी घेणे गरजेचे आहे.
प्रजननास कारणीभूत आपल्या शरीरातील घटक म्हणजे ‘जनन पेशी’. स्त्रियांच्या शरीरात स्त्री बीजे असतात आणि पुरुषांच्या शरीरात शुक्राणू! सामाजिक परिस्थिती, भोवतालचे पर्यावरण, मानसिक संतुलन, आहारातून शरीरात जाणारे घटक, हवेतून त्वचेद्वारे शरीरात जाणारे रासायनिक पदार्थ या सर्वांचा थेट परिणाम आपल्या संप्रेरकांवर आणि जनन पेशींवर होऊन त्यांची क्षमता कमी करतात. वैद्यकीय भाषेत या घटकांना ‘एंडोक्राइन डिसरप्टिंग केमिकल्स’(एऊउ) म्हणजेच ‘संप्रेरके असंतुलित करणारी रसायने’ असे म्हटले जाते. असे रासायनिक घटक जे प्रजननक्षम व्यक्तीच्या संप्रेरकांवर परिणाम करून त्या व्यक्तीसाठी अथवा त्याच्या संततीसाठी धोकादायक ठरू शकतात. बर्याचदा हे घटक अत्यंत कमी प्रमाणात शरीरात गेले तरीही त्यांचा जनुकांवर, मज्जासंस्थेवर किंवा रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. काही घटक तर अनेक महिने यकृतामध्ये साठून राहतात.
स्त्रीच्या शरीरात स्त्री बीजाचा साठा मर्यादित असतो. जी स्त्री बीजे असतात ती जन्माच्या आधी तयार झालेली असतात. ३५ वर्षांपर्यंत हा साठा प्रजननासाठी योग्य असतो. त्यानंतर तो हळूहळू कमी होत जातो. पस्तिशीनंतर स्त्री बीजाची गुणवत्तादेखील कमी होऊ लागते. गर्भपात किंवा गर्भामध्ये जनुकीय विकार होण्याची शक्यता वाढते. भारतीय स्त्रियांमध्ये चाळिशीनंतर पाळी अनियमित होऊन ४५ ते ५० व्या वयात रजोनिवृत्ती होते. मात्र स्त्री बीजाचा अकाली र्हास म्हणजेच ‘प्रिमॅच्युअर ओव्हरिअन इनसफिशिअन्सी’ ही सध्या एक मोठी वैद्यकीय समस्या झाली आहे. रक्तातील ‘अँटी-मुलेरियन हार्मोन’ (EDC) या संप्रेरकाच्या पातळीवरून ती समजून येते. अनेक स्त्रियांमध्ये ‘एएमएच’चे प्रमाण हे तरुण वयातच कमी होते. याचा अर्थ अंडकोषाच्या कार्यक्षमतेचा लवकर र्हास होतो. पाळी अनियमित होऊन पुनरुत्पादन कार्यकाळ कमी होतो. जगभरात १ टक्के स्त्रियांना ही समस्या भेडसावत आहे. त्यातील २५ टक्के स्त्रियांना याची काही कारणे माहीत होतात (उदा. अंडाशयाची शस्त्रक्रिया, संसर्ग, केमोथेरपी अथवा एंडोमेट्रीओसिससारखे आजार). मात्र ७५ टक्के स्त्रियांमध्ये त्याचे कारण समजू शकत नाही. पर्यावरणातील ‘संप्रेरके असंतुलित करणार्या रसायनां’च्या (इडिसी) संपर्कामुळे अंडाशयाचे विकार होऊ शकतात, त्याची क्षमताच कमी होऊ शकते, याची अनेक कारणे विविध शोधनिबंधांत नोंदवण्यात आली आहेत. काही ‘रसायने’ गर्भाशयाच्या गर्भ रुजण्याच्या प्रक्रियेत अडचण निर्माण करतात, ज्यामुळे प्रसूतीकाळात गंभीर समस्या उद्भवू शकतात, काही ‘रसायने’ मातेकडून बाळात संक्रमित होऊन बाळाच्या जनुकांवरदेखील परिणाम करू शकतात. स्त्रियांप्रमाणे पुरुषांमध्येदेखील ‘इडिसी’मुळे संप्रेरके असंतुलित होऊ शकतात. त्यामुळे लैंगिक संप्रेरकांचे उत्पादन कमी होऊन पुरुषांच्या पुनरुत्पादन संस्थेवर त्याचा परिणाम होतो. कधी हा परिणाम तात्पुरत्या स्वरूपात असतो, (लैंगिक इच्छा कमी होणे, लैंगिक क्षमतेचा अभाव, शुक्राणूची संख्या आणि गती कमी होणे आणि या रसायनांचा संपर्क कमी झाल्यावर कार्यक्षमता पूर्ववत होऊ शकते. परंतु कधी कधी हा परिणाम दीर्घकाळदेखील राहू शकतो.
१. थॅलेट्स (Pthalates) – हा रासायनिक पदार्थ प्लास्टिक अथवा रबरी उपकरणे किंवा खेळणी मऊ करण्यासाठी वापरला जातो. त्याचबरोबर अनेक सौंदर्यप्रसाधने आणि अन्नपदार्थ प्रक्रियेतदेखील त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. जवळपास ९५ टक्के लोकांच्या शरीरात ‘थॅलेट्स’चे अंश आढळतात. त्यामुळे स्त्री बीजांची संख्या व गुणवत्ता कमी होते. गर्भवती स्त्रीच्या शरीरात ‘थॅलेट्स’ची पातळी जास्त असल्यास वेळेआधी प्रसूती (preterm labour) होण्याचा धोका असतो. ‘एनव्हायर्नमेंट अँड रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ’ च्या अभ्यासानुसार (EARTH STUDY) ज्या स्त्रियांच्या रक्तात ‘थॅलेट्स’ची मात्रा जास्त होती अशा स्त्रियांमध्ये ‘आयव्हीएफ’ चाचणीमध्येदेखील चांगल्या गुणवत्तेची स्त्री बीजे मिळण्याची शक्यता कमी होऊन प्रजननाच्या यशाची टक्केवारी कमी होते. पुरुषांमध्ये ‘थॅलेट्स’मुळे शुक्राणूची गती कमी होऊन त्यांच्या जोडीदारामध्ये नैसर्गिक गर्भधारणा राहायची शक्यता कमी होते.
२. बिस्फेनॉल-ए (BPA) – हा घटक प्लास्टिकच्या उत्पादनात तसेच हवाबंद खाद्यपदार्थांच्या डब्यामध्ये वापरला जातो. लहान मुलांच्या बाटल्या, चोखण्या यामध्येदेखील त्याचा सर्रास वापर होतो. अशा वस्तूंच्या वापरातून त्याचा आपल्या शरीरात सहज शिरकाव होतो. ‘बीपीए’च्या दीर्घकाळ संपर्कामुळे स्त्री बीजाची गुणवत्ता कमी होते, गर्भाच्या विकासात अडथळा येतो, भ्रूण व्यवस्थित वाढत नाही. शुक्राणूची फलन क्षमता कमी होते. या सर्वांचा परिणाम प्रजनन क्षमता कमी होते.
३. पॉलिब्रोमिनेटेड डायफेनिल इथर (PBDEs)) – फर्निचर आणि कापड उद्योगात, कारपेट आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणात याचा वापर होतो. अगदी रस्त्यावरील धुळीमधूनदेखील याचा शरीरात प्रवेश होतो. हा घटक अनेक वर्षं शरीरात साठून राहतो. शरीरात याचे प्रमाण जास्त असल्यास गर्भपाताचा धोका वाढतो. त्याचबरोबर बाळाच्या मज्जासंस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
४. प्रदूषित हवा – प्रदूषित हवेमुळे होणारे श्वसन विकार सर्वांच्या परिचित आहेतच. परंतु प्रदूषित हवेतील घटकामुळे जनन पेशींतील ‘डीएनए’वर विपरीत परिणाम होतो. शुक्राणूमधील ‘डीएनए’ विखंडन (DNA fragmentation) वाढून फलन क्षमतेवर गंभीर परिणाम होतो.
‘इडिसी’चा संपर्क कमी करण्यासाठी ‘अमेरिकन सोसायटी ऑफ रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिन’ (ASRM) ने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यामध्ये अन्नपदार्थ साठवण्यासाठी प्लास्टिकऐवजी काचेच्या बाटल्यांचा वापर, नैसर्गिकरीत्या पिकवलेली फळे आणि भाज्यांचे सेवन, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे कमीत कमी सेवन, सुगंधी द्रव्यांचा कमी वापर, प्रसाधनांमध्ये वापरण्यात येणार्या रासायनिक पदार्थांच्या मात्रांवर कायद्याचा लगाम अशा काही बाबी सांगितल्या आहेत.
अशी रसायने आपल्या सभोवती विपुल प्रमाणात असतात. रस्त्यावरच्या धुळीपासून ते पिकावरच्या कीटकनाशकांमध्ये, लहान मुलांच्या बाटल्यांपासून ते हवाबंद अन्नपदार्थांमध्ये, सौंदर्यप्रसाधनापासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत सर्वांमध्ये ते कमी अधिक प्रमाणात आहेतच. यातील काही घटक कर्करोगजन्य अथवा काही गर्भातील बळावर गंभीर परिणाम करणारे (Teratogenic) म्हणून सिद्ध झाले आहेत. मात्र अनेकांचा अजून त्यावर अभ्यास चालू आहे, त्यांचे मानवी शरीरावरील दुष्परिणाम हळूहळू समजून येत आहेत. त्यांच्या वापरावर मर्यादा नाही. सगळ्याच गोष्टी कायद्याने बंद करता येत नाहीत किंवा कायद्यातून पळवाट काढून यांचा वापर करणारे कमी नाहीत. माहितीच्या अभावामुळे अनेक गोष्टींचा चुकीच्या पद्धतीने वापर करणारे सामान्य लोकदेखील कमी नाहीत. (उदा. प्लास्टिकच्या भांड्यात अन्न गरम करणे, वर्षानुवर्ष जुन्या झालेल्या बाटल्या, डबे वापरणे, मुदत संपल्यानंतरची सौंदर्यप्रसाधने वापरणे) या सर्व गोष्टींमुळे रासायनिक पदार्थाचा शरीरात सहज प्रवेश होतो आणि कळत नकळत याचा परिणाम आपल्या पुनरुत्पादन क्षमतेवर होतो.
प्रत्येक पुढच्या पिढीत मागच्या पिढीपेक्षा प्रजनन क्षमता कमी झालेली आढळून येत आहे. मात्र आपल्या भविष्यासाठी, पुढची पिढी वाढवण्यासाठी, लोकसंख्येला स्थिर ठेवण्यासाठी आणि सुदृढ संततीसाठी आपल्याला या बाबतीत काळजी घेऊन वागणे ही आजची गरज आहे.
To learn more about the latest developments in Public Health, stay updated with our exclusive reports and analyses on AiLensNews.