गेल्यावर्षी भारतात नेग्लेरिया फाउलेरीच्या संसर्गाची 200 हून अधिक प्रकरणे आढळून आली. हा आतापर्यंतचा जगातील सर्वात मोठा उद्रेक मानला जातो.
नवी दिल्ली, भारत ९ जुलै, २०२६ ALN: कुटुंबासोबत कोस्टा रिकाला सुट्टीसाठी गेलेल्या स्टीव्ह स्मेल्स्की यांच्यावर अवघ्या काही दिवसांतच दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.
स्टीव्ह यांना आपल्या मुलाला कायमचा निरोप द्यावा लागला.
मृत्यूसमयी जॉर्डन केवळ 11 वर्षांचा होता. नेग्लेरिया फाउलेरी या 'मेंदू खाणाऱ्या अमीबा'मुळे झालेल्या मेंदूच्या संसर्गामुळे त्याचा मृत्यू झाला होता.
हा अमीबा सहसा उबदार तलाव, गरम पाण्याचे झरे आणि वापरात नसलेल्या जलतरण तलावांमध्ये आढळून येतो. पाण्यात उडी मारताना तो नाकावाटे शरीरामध्ये शिरतो आणि थेट आपल्या मेंदूवर हल्ला करण्यास सुरुवात करतो.
भावूक झालेले स्टीव्ह बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसशी बोलताना म्हणाले की, "जॉर्डन फक्त एकदाच पोहायला गेला होता, आणि आता तो आमच्यात नाही."
गेल्यावर्षी भारतात नेग्लेरिया फाउलेरीच्या संसर्गाची 200 हून अधिक प्रकरणे आढळून आली. हा आतापर्यंतचा जगातील सर्वात मोठा उद्रेक मानला जातो.
गेल्या काही महिन्यांतही भारतात या संसर्गाची नवीन प्रकरणे सातत्याने समोर येताना दिसत आहेत. यापूर्वी जगभरात मिळून 500 पेक्षा कमी रुग्ण आढळून आले होते.
या उद्रेकामुळे संशोधकांमध्ये पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. कारण हा परजीवी पूर्वी क्वचितच आढळणाऱ्या ठिकाणीही आता दिसू लागला आहे. यात युरोप आणि पूर्व आशियातील काही भागांचाही समावेश आहे.
"मला वाटतं भविष्यात या संसर्गाची प्रकरणं आणखी वाढतील. हा आजार जगभरात दिसू लागेल," असे ब्रिटनमधील केंट विद्यापीठातील मॉलेक्युलर पॅरासाइटालॉजिस्ट डॉ. अनास्तासिओस त्साओसिस यांनी म्हटलं.
अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणारे स्टीव्ह आपल्या मुलासोबत कोस्टा रिकामधील हॉटेलजवळच्या एका नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यात वॉटर स्लाइड्सचा आनंद घेत होते. त्यांनी तिथे बराच काळ घालवला. त्यानंतर अचानक जॉर्डनला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला.
नंतर ते विमान प्रवास करून घरी परतले. तेव्हा जॉर्डनची डोकेदुखी आणखी वाढली. त्याला उलट्याही होऊ लागल्या. त्यामुळे त्याचे आई-वडील त्याला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. तिथे त्याला वेगवेगळे भास होऊ लागले. छतावर किडे रांगताना, सरपटताना दिसत आहेत, असं तो आई-वडिलांना सांगू लागला.
"तो आमच्याकडे पाहत होता, पण आम्ही कोण आहोत हे त्याला ओळखता येत नव्हतं. मला वाटतं तो स्वतःचीही ओळख विसरला होता," अशी आठवण स्टीव्ह यांनी सांगितली.
जॉर्डनला असा नेमका कोणता आजार झाला आहे, हे समजून घेण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत होते. त्याच दरम्यान त्याला फिट आले. त्यानंतर त्याला अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.
"पोहायला गेल्यानंतर अवघ्या साडेसात दिवसांत आम्ही जॉर्डनला गमावून बसलो. त्याआधी त्याला कोणताही आजार नव्हता. तो पूर्णपणे निरोगी होता," असं स्टीव्ह यांनी सांगितलं.
जॉर्डनचा मृत्यू प्रायमरी अमेबिक मेनिंगोएन्सेफलायटिस (पीएएम) या गंभीर मेंदूच्या संसर्गामुळे झाला. हा संसर्ग नेग्लेरिया फाउलेरी या अमीबामुळे होतो.
पीएएम झालेल्या अनेक रुग्णांप्रमाणे जॉर्डनलाही सुरुवातीला मेंदूज्वर (मेनिंजायटिस) झाला असावा, असे डॉक्टरांना वाटले. कारण या दोन्ही आजारांची सुरुवातीची लक्षणे बऱ्याचप्रमाणात सारखी दिसतात.
डॉक्टरांना नेमका आजार समजेपर्यंत खूपच उशीर झाला होता. संसर्गामुळे जॉर्डनच्या मेंदूला तीव्र सूज आली होती आणि त्याच्या मेंदूचे नुकसान भरून न येण्याइतके झाले होते.
"हा आजार माणसाचं भान हरपवतो, मन हिरावून घेतो. विचार करण्याची त्याची क्षमता कमी करतो आणि माणसाचं अस्तित्वच जणू हिरावून घेतो," असे स्टीव्ह म्हणाले.
2025 मध्ये स्लोव्हाकियामध्ये नेग्लेरिया फाउलेरी संसर्गाचे पहिले प्रकरण नोंदवले गेले.
याशिवाय, या अमीबाच्या नेहमीच्या आढळण्याच्या क्षेत्राबाहेर असलेल्या अमेरिकेतील उत्तरेकडील थंड राज्यांमध्ये, जसं की मिनेसोटामध्येही, या संसर्गाची नवीन प्रकरणे दिसू लागली आहेत.
या अमीबाचा संसर्ग केवळ नेहमी आढळणाऱ्या किंवा पारंपारिक संबंधित असलेल्या तलाव आणि नद्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. याच्या काही प्रकरणांचा संबंध इतर ठिकाणांशीही आढळून आला आहे.
2023 मध्ये तैवानमध्ये एका व्यक्तीचा नेग्लेरिया फाउलेरीच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्याला हा संसर्ग इनडोअर सर्फिंग सुविधेच्या ठिकाणी झाला होता. त्याच वर्षी अमेरिकेत एका लहान मुलाला दूषित पाण्याच्या स्प्लॅश पॅडमधून याचा संसर्ग झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
हवामान बदलामुळे तलाव आणि तळ्यांमधील पाण्याचे तापमान वाढत आहे. त्यामुळे हा अमीबा पूर्वी ज्या थंड भागांमध्ये जिवंत राहू शकत नव्हता, अशा ठिकाणीही आता तो पसरू लागला आहे.
"पाण्याचं तापमान वाढलं की, हा अमीबा अधिक सक्रिय होतो. त्यामुळे पाण्यात पोहणे किंवा मनोरंजनाच्या इतर उपक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांना त्याचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते," असे त्साओसिस यांनी सांगितले.
ते म्हणतात की, घाबरण्याचं काहीच कारण नाही, परंतु वाढत असलेल्या धोक्याबाबत लोकांनी 'सावध' असणे गरजेचं आहे.
याशिवाय, शास्त्रज्ञ आता हा अमीबा शोधण्यात जास्त सक्षम झाले आहेत. त्यामुळेही या संसर्गाची नोंद झालेली प्रकरणे वाढताना दिसत आहेत, असंही त्यांचं मत आहे.
"माझा अंदाज असा आहे की, या संसर्गाची संख्या कदाचित पूर्वीपासूनच जास्त असावी. परंतु आता आपल्याला त्याची तपासणी कशी करायची हे माहीत झालं आहे, त्यामुळे ही संख्या वाढत असल्याचे आपल्या लक्षात येत आहे," असं त्साओसिस यांनी सांगितलं.
तज्ज्ञांच्या मते, प्रौढांच्या तुलनेत मुलांना नेग्लेरिया फाउलेरीचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
"या आजाराची लागण झालेल्यांचं सरासरी वय साधारण 12 वर्षे इतके असते. कारण मुलांना गरम पाण्यात खेळायला आणि उड्या मारायला खूप आवडतं," असे वेस्टर्न सिडनी विद्यापीठातील जलविज्ञान तज्ज्ञ प्रा. इयान राइट यांनी सांगितले.
"हा आजार अत्यंत क्रूर आहे," असं ते म्हणतात.
काही शास्त्रज्ञांचं असंही मत आहे की, लहान मुलांना या संसर्गाचा धोका जास्त असू शकतो. कारण लहान मुलांमध्ये नाक आणि मेंदू यांच्यातील अडथळा ओलांडणे अमीबाला तुलनेनं सोपं जाऊ शकतं.
"हे एखाद्या भयानक स्वप्नासारखं, हॉरर चित्रपटासारखं किंवा स्टीफन किंग यांच्या कांदबरीसारखं वाटतं," असं राइट म्हणतात.
"हा संसर्ग होण्याची शक्यता खूपच कमी आहे, पण जर तो झाला तर मृत्यूचा धोका कदाचित खूप जास्त असू शकतो."
2025 मध्ये प्रकाशित झालेल्या 'जर्नल ऑफ इन्फेक्शन अँड पब्लिक हेल्थ'मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, 1962 ते 2023 या काळात जगभरात या संसर्गाची केवळ 488 प्रकरणे नोंदवली गेली होती. यातील बहुतांश प्रकरणं ही अमेरिका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामधील होती. यातील सुमारे 97 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला.
या आजाराचे निदान सुरुवातीच्या टप्प्यातच झाले तर डॉक्टर विविध औषधांच्या मदतीने उपचार करण्याचा प्रयत्न करतात. तसेच मेंदूची सूज कमी करण्यासाठीही उपाय केले जातात. तरीही या आजारातून वाचण्याची शक्यता खूपच कमी म्हणजे दुर्मीळ असते.
परंतु, भारतातील दक्षिणेकडील राज्य केरळमध्ये नुकत्याच झालेल्या उद्रेकामुळे हा आजार किती जीवघेणा आहे, याबाबतच्या जुन्या समजुतींना आव्हान मिळाले आहे. केरळ हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळही आहे.
'कम्युनिकेशन्स मेडिसिन'मध्ये प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनानुसार, ज्यांच्या उपचारांची माहिती समोर आली अशा 200 रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक लोक वाचले. ही संख्या या आजारातून वाचण्याच्या आधीच्या सुमारे 3 टक्के दरापेक्षा खूप जास्त आहे.
या संशोधनातील निष्कर्षातून असं दिसून येतं की, 'मेंदू खाणाऱ्या अमिबा'मुळे होणारा संसर्ग पूर्वी वाटत होता तितका असाध्य (उपचार न होणारा) नसू शकतो.
या अभ्यासाशी संबंधित संशोधकांच्या मते, आजार लवकर ओळखणे, डॉक्टरांना त्याबाबत अधिक माहिती असणे आणि योग्य उपचार मिळणे यामुळे रुग्ण वाचण्याचे प्रमाण वाढले असावे.
पाण्यात खेळण्याबरोबरच, नेग्लेरिया फाउलेरी हा अमीबा नाक स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणातूनही शरीरात जाऊ शकतो. सर्दी, सायनसचा त्रास किंवा अॅलर्जीची लक्षणे कमी करण्यासाठी अशा लांब नळी असलेल्या बाटल्या वापरल्या जातात.
गेल्या वर्षी अमेरिकेतील टेक्सास राज्यात एका 71 वर्षीय महिलेचा अशाच उपकरणाचा वापर केल्यानंतर दोन आठवड्यांच्या आतच मृत्यू झाला. ती महिला निरोगी होती. या महिलेने हे उपकरण मोटरहोममधील नळाच्या पाण्याने भरले होते.
नाक स्वच्छ करण्याची किंवा धुण्याची पद्धत काही धार्मिक आणि पारंपारिक प्रथांचाही भाग आहे. यामध्ये इस्लाम धर्मातील काही प्रथा तसेच भारतातून सुरू झालेल्या आयुर्वेद या पारंपरिक उपचार पद्धतींचा समावेश होतो.
हा धोका आधीच खूप कमी आहे, पण काही सोप्या उपायांनी तो कमी करता येऊ शकतो.
To learn more about the latest developments in Diseases & Conditions, stay updated with our exclusive reports and analyses on AiLensNews.